Home Kalidas Kalidas information in marathi essay speech nibandh biography कालिदास जयंती Kalidas Kalidas information in marathi essay speech nibandh biography कालिदास जयंती By atish May 03, 2015 0 Comments कालिदास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम्, आणि अभिज्ञानशाकुंतलम ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत. आख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्यास त्याच्या पत्नीने विचारले:अस्ति कश्चित वाग्विशेषः?(वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?). कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्नीचे बोलणे अपमास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्याने पत्नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’,कश्चित’ आणि ’वाग्’ या आरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले. ’अस्ति’पासून - अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥ ...कुमारसंभव ’कश्चित्’पासून - कश्चित्कांता विरहगुरुणां स्वाधिकारात्प्रमत्तः.। शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥...मेघदूत ’वाग्’पासून - वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ ...रघुवंश विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदशी राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणू काही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठ्या मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. उपमा कालिदासस्य असे म्हणतातच. ते सार्थ आणि समर्पक वाटावे, अशी ती उपमा आहे. मूळ श्लोक असा आहे - संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा । नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल: ।। — रघुवंश ६.६७ ”रात्रीच्या वेळी राजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे, आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा; ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा; ज्योत ज्या महालासमोरून चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्यावेळी, इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर तो निराशेने काळाठिक्कर पडे.” किती छान उपमा आहे पाहा ! या उपमेवरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असे गौरविले जाते. मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या दोन ओळी - आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।। अशा आहेत. यावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी, कालिदास जयंती म्हणून पाळली जाते. www.marathisms.blogspot.com Kalidas