SMS Category
Home
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर पां.द.खाडिलकर
शाहिस्तेखानाचा पराभव (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥ छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥ चौक १ केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला । स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥ चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! । शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥ शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! । कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥ भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्याला झाला । फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !’ ॥ दर्याखोर्यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां । विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥ फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! । टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥ दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला । रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥ विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला । बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥ "चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला । सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥ बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा । मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥ शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! । हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥ "काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला । पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥ स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला । फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥ जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला । वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥ प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला । धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥ चौक २ नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार । मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला । केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥ आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला । उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला । किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥ चाल शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला । "र्हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला । शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥ शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥ कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ? ॥ शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा । पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला । फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥ चाल "शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥ शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥ शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥ चाल बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना ! तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला । दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला । लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला । जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥ परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला । कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! । जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥ चाल ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला ! पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! । खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥ चाल शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥ चाल चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं । मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला । शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥ चौक ३ शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन । बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला । हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥ खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण । पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला । धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥ सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा । शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा । मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत । निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात । कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं । घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥ शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन । काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥ पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं । जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट । घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट । कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥ चाल घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला । शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला । पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा । पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला । झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला । दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! । गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला । अन् एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला । भार्यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला । तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन । वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला । काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला । गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥ चौक ४ लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून । खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून । खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान । भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥ खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला ! पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार । तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन । अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला । "आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥ चाल शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला । म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला । इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला । तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला । जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला; । आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! । हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला । खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥ गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥ चाल "धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥ जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥ पण आठवण रहावी रे तुजला’ म्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥ आजपासून ऐक बोलाला । म्हण ’शास्ताखान । आपणांला" ॥असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा । लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला । अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला । धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥ शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला । अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा । अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥ चाल गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून । तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला । यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥ वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा --- पोवाडा शाहीर पां.द.खाडिलकर ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी । घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥ झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥ चौक १ शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण । जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन । बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण । हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥ जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं । किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं । मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं । तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥ केल्या स्वार्या अवरंगजेबाच्या मुलखामधून । चार दिवस सुरत शहराची लूट मारुन । अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन । भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण । ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥ कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून । पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! । भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं । आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥ ’शिवाजी डोंगई उंदीर फार लहान । तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---’ । असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम । धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥ उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्नं पार घुसून । पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण । कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥ अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥ शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला । "शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥ हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला । तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला । प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला । त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला । हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला । दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥ असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥ ’तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला’ ॥ पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला । जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥ हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥ बारीक सारीक सार्या बातमीला । नीट काढा आतां या वेळा । नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥ चौक २ मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार । घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥ वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥ मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण । आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला । निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट । होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला । आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥ चाल विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥ कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला । अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला । हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला । मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥ तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा । आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥ वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥ फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला । जावळीच्या मोर्याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥ शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥ माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला । शिवाजीचा नाश करण्याला । कुर्हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥ कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! । असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला । सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥ चाल "जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले । सर्व बिघडले । दास ते बनले । मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥ चाल हें असें मला बघवेना, या पुढें ॥ पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥ निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥ चाल क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला । देह हा या कामीं वहिला ! ॥ चाल पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥ हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला । जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥ दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! । हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला । परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला । आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥ द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥ चौक ४ ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान । लाल झाला रागानं म्हणे ’हा जयसिंग कोण ? । तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं । हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून । शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥ मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान । "तह नका करुं शाहाच्या हुकमावीण । कायमचा कांटा काढायची संधि सोडून । कां असें मनीं बिचकतां आज हो आतां । धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! । उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण । कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून । धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥ दाढीवरन्म मोठया तोर्यानं हात फिरवून । "शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं । हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥ चाल वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला । मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला । तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला । मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला । तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला । म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥ डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला । ’सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला’ । असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥ चौक ५ गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड । भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला । दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥ पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्ला जल्दीनं । पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला । किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥ चाल इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥ इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥ पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥ पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥ चाल मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर । शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला । फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥ धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली । शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला । कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥ चाल मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला । भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला । मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला । शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला । दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्कन किल्ल्यावरती गेला ! । यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला । अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला । उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला । बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला । मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला । पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला । तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला । हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला । पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥ चाल मग झाला रागानं लाल दिल्लीरखान । म्हणे ’ठार करिन सैतान तलवारीनं । उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन’ । वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥ चौक ६ निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला । गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला । सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !। धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा । गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला । बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥ चाल शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥ तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥ परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ? । तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥ चाल ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा । बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! । मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥ शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला । खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला । मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥ चाल पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा । वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥ मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा । असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला । बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥ दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला । खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला । काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला । असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला । मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥ चौक ७ मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला । आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्न मी केला ! ॥ किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला । शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला । थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा । आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला, लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला । डाग कीर्तीला । जन्मभर जडला । कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥ जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला । वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥ चाल पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥ कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥ चाल तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून । हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे ! हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान । गुंतलों हरिण । तडफडे मीन । कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥ चाल काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥ सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥ काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ? ॥ म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥ चाल बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ । हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥ प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण । स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥ चाल प्रियपत्नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥ "नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥ चाल तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥ किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥ अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥ अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥ चाल कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥ हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥ माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥ पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥ चाल मी वीरपत्नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर । होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥ पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥ अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥ डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥ चाल बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला । गद्गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला । जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥ चौक ८ जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण । प्रिय पत्नीकडे शेवटली दृष्टि टाकून । शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन । ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥ जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा । एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा । तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा । तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ? ॥ का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! । अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! । कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! । यवनांचा कराया अंत । जोरानं जात । तेज उधळीत । आज या वेळा ! । तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान । त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून । थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! । म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥ खणखणले भाले तलवार । झुंजती वीर । म्हणती ’हर हर महादेव’ वीर गुंग झाला । लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला । हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं । कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला । होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥ चाल खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला । हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा । अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला । अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥ ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला । "काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला । हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥ एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥ पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥ देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" । असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला । अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा । कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! । मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला । मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला । खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला । इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला । तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥ तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला । मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला । ’स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥ धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥ चौक ९ देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले । मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला । "बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥ प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला । खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला । अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून । साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला । डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥ चाल पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥ बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥ "कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्ग घेऊन । द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥ चाल असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्याच्या प्रेतावर शेला । टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला । अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला । अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला । "सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! । सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला । सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" । असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा । पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥ शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला । शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला । अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला । "बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् । अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥ चाल त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥ जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥ चाल तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य । चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥ www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj