SMS Category
Home
jivan kavita in marathi
माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेलं होतं पोपट, कुत्रा, मांजरांना मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही 'लॉक' नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१|| आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होतं- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं, पाहुण्यांचं येणं-जाणं नित्याचंच होतं- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२|| घरासमोर छोटंसं अंगण होतं- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं, दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं- विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होत, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||३|| आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा, दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा- दगडाने अंग घासणं फारसं सुसह्य नव्हतं तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||४॥ पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं- अंडरपँट बनियनवर फिरणं जगन्मान्य होतं शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||५॥ शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता, पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं.. तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||६॥ शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता- नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता, अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता- कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||७॥ नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा- पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, शाळेचा युनिफॉर्म थोरल्याकडूनंच मिळायचा- तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||८|| वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या- पोपटांचा थवा झाडावर विसावायचा, कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा- उंदीर, डास, ढेकुण यांचं सार्वभौम राज्य होतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||९|| पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे- घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे, उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे- नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१०|| शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत होतं, कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं- वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||११|| गावची जत्रा हीच एक करमणूक असायची– चक्र, पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची- विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१२|| गावाबाहेरचं जग हिरवंगार असायचं- सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छंच असायचे, पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं- प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१३|| हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा- क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या- डे-नाईट, ट्वेंटी-२० चे नावही नव्हते, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१४|| प्रवास झालाच तर एस्. टी. नेच व्हायचा- गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा, होल्डॉलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा- लक्झरी, फर्स्टक्लास, एसीचं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १५ || दिवाळी ख-या अर्थाने दिवाळी होती- चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती, रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती- लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकंच होतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१६|| जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची- बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची, रेडीयो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची- ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१७|| खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा- दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा, पानात टाकणा-याच्या पाठीत रट्टा बसायचा- हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१८|| मामाच्या गावाला कधी जाणं-येणं होतं- दंगामस्ती करायला नॅशनल परमिट होतं, विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं- भाऊबीजेला आईच्या ताटात फारसं पडत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१९|| घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे- बायांना दुपारी झोपणं माहिती नसायचं, पोराबाळांना गोडधोड सणावारीच मिळायचं- प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२०|| पाव्हणे रावळे इ. चा घरात राबता असायचा- सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा, गाववाल्यांनाही पंक्तीत सन्मान असायचा- पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२१|| आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे- मोपेड, स्कूटर, मोटारचा सुळसुळाट आहे, टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे- फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स यांना सन्मान आहे, कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे ||२२|| आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत- दूध, बूस्ट, कॉम्प्लानचा भरपूर मारा आहे, क्लास, गाईड, कॅलक्युलेटरची ऐशच ऐश आहे- कपडे, युनिफॉर्म, क्रीडासाहित्य हवे तितके आहे, बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे ||२३|| आज पतीला ऑफिसात मरेपर्यन्त काम आहे- सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे, एक्स्ट्रा अॅक्टिविटीजना घरात सन्मान आहे- छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहेत, आजीआजोबांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे ||२४|| आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे- मागेल ती वस्तू क्षणात हजर होते आहे, इन्स्टॉलमेंट, क्रेडीट कार्डचा सुळसुळाट आहे- सध्या ‘बाय् वन् गेट वन्’ चा जमाना आहे... म्हणून... पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे www.marathisms.blogspot.com
Life