SMS Category
Home
shiv jayanti powada
शिवदर्शन (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील (चाल : अलंकार) अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा, कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा, छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥ इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती । प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली, वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई, रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥ (चाल : दौड ) त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥ ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥ हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥ गातो ’आत्माराम’ इतिहास पवाडा ऐका ॥ बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं । कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ? वर्हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ? आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥ जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥ चाल : अलंकार हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर । इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला । शहाजी भोंसला त्राता उरला ॥ (चाल : दौड) इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥ उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥ जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥ डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥ डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा । संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा । सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा । माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥ ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं । जाधवाला त्यांनीं फितवलं । ’चोवीस हजार’ मनसुबा केला बहाल ॥ मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन् लाल चावलं ॥ दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥ सासर्यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्यासंगं दंड थोपटलं ॥ चाल : स्फूर्ति सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां । जांवई शहाजीराजा त्राता निजामाला । दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला । राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला, पणा लागला, ऐका कवनाला ॥ चाल : वीरश्री महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं । हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥ शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला । आणि त्याच्या विधवा मातेला । चाल : दौड घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥ वीर-पत्नी बाई जिजाई होती संगतीला ॥ पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥ काय करावं अशा समयाला ? सुपारीवर आडकित्ता आला ! चाल : वीरश्री दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥ भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥ चाल : दौड दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥ चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥ ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥ चाल : अलंकार ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला । कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला । निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं, मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला । शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥ चाल : रणघाई आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥ घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥ रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी ! रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी ! तलवारी पट्टा फडफडा ॥ खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥ लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं । साथ त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥ शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥ साथ त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥ जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥ साथ पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥ जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥ साथ त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली । चाल : विजया आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥ किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥ शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥ जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥ दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥ खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥ चाल : स्फूर्ति घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं । तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती । नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती । सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥ पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला । लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥ चाल : हळहळ जाधवानं डाव फिरविला ॥जी॥ भेटे निजामाच्या आईला ॥जी॥ लाघवी बोल बोलला ॥जी॥ "बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ? करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला, देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला । माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥ तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥ त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥ तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥ फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान ! देतों इशार्याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात, भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥ परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला, झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई, बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला । घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला । किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई । सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥ गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला । तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥ ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥ चाल : दामिनी बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥ चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥ धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥ आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्याला ॥ चाल : वीरश्री मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला । मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥ मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला । स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥ चाल : चिंता फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥ आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥ झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥ चाल : समता सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं । तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान । थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण । पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥ बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला, आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला, हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला, लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला, ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला । वाहीन प्राण आपुला । चाल : दौड बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥ शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥ आगींत एक; फोफाटा नेई दुसर्याला ॥ माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला, होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला ! तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला । तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥ एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥ जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥ अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥ फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥ चाल : अलंकार रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं । वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला । आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार । जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं । हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥ घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा । ’पकडो रे दौडो शहाजी भागा ।’ लेक-जांवई गेल्या मागा । सासरा लागला पाठलागा ॥ चाल : दौड धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥ विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥ माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला । दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥ महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥ तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥ तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥ पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥ त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥ चाल : वीरश्री पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर । मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥ पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती । दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥ घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं । अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥ चाल : स्फूर्ति लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा, नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला । दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥ चाल : गजगामिनी बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥ डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥ पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥ पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ । जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥ काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले । चाल : वीरश्री क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया । तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥ ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी । बोलली वीराला रमणी । चाल : स्वयंसिद्धा तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥ सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥ ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥ चाल : मौलिक ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥ संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥ चाल : अलंकार राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर । तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार । स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला । जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला । किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥ चाल : समता सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत । सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ । रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत । सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥ गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत । गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥ परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त । अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥ चाल : वीरांगना त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥ संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥ दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥ ’सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां । तारील भवानी माता ॥’ ते दोन जिवांचे बोल । तिसर्या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां । अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें । वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां । पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच । सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच । तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥ चाल : अलंकार गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे । राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली । जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥ चाल : छक्कड सासर्याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई । हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥ रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली । भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥ त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती । किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥ पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती । जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥ ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी । जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥ थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ । ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥ ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली । अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥ बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले । बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥ (लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती, कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥ मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें । तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥ तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे । परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥ तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे । मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥ क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे । पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥ तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे । परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥ तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे । परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥ चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं । बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥ या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं । माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥ (पडद्या आडून शाहीर गात आहे---) चाल : कोंकवती अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥ तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥ असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥ थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥ घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार । ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥ (जिजाबाई म्हणते----) चाल : मानिनी जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥ तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥ तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥ हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥ घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक । ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें । धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥ जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥ उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥ वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥ मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र । मत्प्राणपति नि सत्पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें । तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥ हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥ चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर । या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें । डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥ या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥ तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥ दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा । या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें । पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें । जा उतरा गड जो चढले ॥जे०॥ (जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---) चाल : कोंकवंती नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें । उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें ! गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें । ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले । उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे । तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें । उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर ’पूर्णमास’ वेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें । तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥ साथ : टाहोचा आवाज टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर । विश्वांत झाला चमत्कार । सांगतो ’आत्मा’ शाहीर । ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार । ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर । धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार । भंवर्यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार । पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर । आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार । प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर । अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर । गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर । तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर । उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर । असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर । गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार । नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला, सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा, झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला, आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ? एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥ मुक्त छंद धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे । मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥ भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे । रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥ स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे । इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥ कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे । अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥ अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे । नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे । परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥ वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे । स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥ सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे । स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥ तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" । डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥ जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे । भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥ आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं । शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥ काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं । शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥ (टाहोचा आवाज--पुढें पोवाडा) फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा । पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥ शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा । सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥ धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं । मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग । हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥ फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद, संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं, खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद । नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ, दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट । कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत ! कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत । कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र । होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र । फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट । पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत । शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥ चाल : अलंकार शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें । राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला । हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥ आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा, नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला, पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला । प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला । सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला । वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला । सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर ’आत्माराम’ तोच गातो आजला । ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥ www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj